

पुढारी ऑनलाईन डेस्क : परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम छत्रपती संभाजीनगर येथे करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता या पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल आज (दि.२०) समोर आलेला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाबाबत आजार असल्याचे सांगितले आहे.
परभणी येथे संविधानाची झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झालेल्या कायद्याचे तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पोलिस कोठडी घेऊन नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. परभणी शहरात संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यादरम्यान ही घटना घडली होती.
दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी यांना श्वसनाचा आजार असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. त्यांना पोलिसांकडून कोणतीही मारहाण झालेली नाही. जळजळ व्हायला लागल्यानंतर सुर्यवंशींना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोमनाथ यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करणार असल्याची माहिती विधानसभेत आज (दि.२०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
परभणीत काही आंदोलकांनी जाळपोळ केली. या प्रकरणी ५१ लोकांना ताब्यात घेण्यात आले. माहिला आणि मुलांना सोडून देण्यात आले. सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले. सामान्य लोकांचेही मोठे नुकसान झाले. काही लोक सीसीटीव्हीत तोडफोड करताना दिसतात. काही लोकांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण ही हिंदू विरुद्ध दलित अशी दंगल नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.