

पूर्णा/सेलू/ताडकळस : पूर्णा व सेलू तालुक्यात ६ आणि ७ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः शासनाच्या विविध योजनांतर्गत बसविण्यात आलेल्या सोलर कृषी पंपांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी सोलार पॅनल उखडून पडले, तर काही ठिकाणी पॅनल पूर्णतः निकामी झाले आहेत. परिणामी ऊस, केळी व इतर बागायती पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
ताडकळसजवळील देऊळगाव दुधाटे, गोळेगाव, आहेरवाडी, एरंडेश्वर, कात्नेश्वर तसेच सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव परिसरात या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. देऊळगाव दुधाटे येथील शेतकरी पुरुषोत्तम संच वाकून जमिनीवर कोसळल्याने कृषी पंप बंद पडले आहेत. तर आहेर बोरगाव येथील शेतकरी धोंडीराम जिजाभाऊ लहाने यांच्या शेतातील अनेक पॅनल उडून गेल्याने सिंचन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
सध्या परिसरात उष्णतेचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाणी मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र सोलार पंप बंद पडल्यामुळे ऊस, केळी, भाजीपाला व इतर बागायती पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सोलार पंप उभारले होते. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे त्यांच्यासमोर दुहेरी आर्थिक संकट उभे राहिले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोलर पंप व पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. सोलार यंत्रणा बंद पडल्याने उभ्या पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा बागायती पिकांचे मोठे नुकसान होईल.
लक्ष्मणराव माणिकराव मोरे, शेतकरी, आहेरवाडी