Sangli News : निंबळकसह येरळा पट्ट्यात पिके करपली

आरफळच्‍या पाण्याने दिली ओढ, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
Sangli News
निंबळकसह येरळा पट्ट्यात पिके करपली
Published on
Updated on

निंबळक : तासगाव तालुक्यातील निंबळकसह, येरळा पट्ट्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून वाढलेल्या तापमानाने पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. भागात आरफळ कॅनॉलच्या पाण्याने ओढ दिली असल्याने तसेच एकाही उन्हाळी पावसाने हजेरी लावली नसल्याने शेती धोक्यात आली आहे.

निंबळक भागातील चिखलगोठण, आळते, लिंब, बोरगाव शिरगाव यासह येरळा काठावरील आंधळी, मोराळे, राजापूर, ढवळी, तुरची भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने तासगाव तालुक्यातील शेतीला संजीवनी ठरणारी आरफळ पाणी योजना ऐन उन्हाळ्यात कोरडी ठणठणीत पडल्याने भागात शेतीपाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

येरळा पट्ट्यातील सर्वच भागात पाण्याची पातळी खाली गेली असून शेती पिकांच्या मोटारी अवघ्या काही तासात पाण्याविना बंद होत आहेत. त्यातच भर म्हणून महावितरण कंपनीने शेती पंपाच्‍या वेळेत घट केली असून नवीनच फोर्स लोड शेडिंग फंडा अमलात आणल्याने तर नागरिक पुरते हैराण झाले आहेत. चालू हंगामात पूर्णच उन्हाळी पावसाने दडी मारल्याने शेती मशागतीच्या कामांचा सुद्धा खोळंबा झाला आहे. मागीलवर्षी पावसाने नेले, यावर्षी उन्हाने गेले, अशी गत झाली आहे. निंबळकसह येरळा पट्ट्यातील शेती पाण्याचा व विजेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

शेतीसाठी लागणारे पाणी आरफळ योजनेतून चालू करा व शेती वाचवा, शेतीसाठी पुरेशी वीज द्या, महावितरण कंपनीने चालू केलेले विना टाईम फोर्स लोड शेडिंग बंद करून नागरिकांचे हाल थांबवा. या अडचणी सोडवणार कोण? मतदान खानापूर मतदार संघात अन्‌ पुढारपण तासगाव तालुक्यात, अशामुळे येरळा काठावरील अडचणी संपतच नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news