

Speeding car hits two two-wheelers; three injured in the accident
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा-नांदेड महामार्गावर गौर शिवारात भरधाव कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिक व चुडावा पोलिसांनी जखमींना तातडीने परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पूर्णाकडून नांदेडकडे जाणारी कार (एमएच २२ बीसी ३८४०) गौर शिवारात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या अनियंत्रित कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोराची धडक दिली आणि ती थेट रस्त्याकडेच्या खड्यात कोसळली. माहिती मिळताच बीट जमादार हनवते व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास चुडावा पोलीस करत आहेत.
सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी
या महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातप्रवण ठिकाणी वेगमर्यादवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आणि सुरक्षात्मक उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.