

Women here in Purna have stepped forward for Maratha reservation
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मराठा समाजातील महिलाशक्तीही आंदोलनाच्या मैदानात उतरली. सकल मराठा महिला भगिनींनी बुधवारी (दि.9) एकत्र येत तहसीलदारांना निवेदन देऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने कायदेशीर निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष सुरू असतानाही शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णेतील महिलांनी एकजूट दाखवत शासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करून ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून केली.
पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या अडचणींमुळे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने स्पष्ट व प्रभावी कार्यपद्धती निश्चित करावी, अशी अपेक्षाही महिलांनी व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या धर्तीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शुल्क सवलत आणि शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा. आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली. मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय्य हक्क मिळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस व कायदेशीर निर्णय घ्यावा.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून त्यांची अंमलबजावणी केली नाही, तर लोकशाही व सनदशीर मार्गान आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. येत्या 12 सप्टेंबर रोजी जरांगे पाटील यांच्या बैठकीत आंदोलनाबाबत निर्णय झाल्यास तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता महिलाशक्ती सक्रियपणे सहभागी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. आंदोलनाच्या काळात विविध ठिकाणी दाखल झालेले गुन्हे कायम राहिल्यास समाजात नाराजी वाढण्याची शक्यता असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले.