

Jintur Aundha Highway Incident
जिंतूर : जिंतूर–औंढा महामार्गावरील पुंगळा येथे रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.१०) सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तातडीने गतिरोधक बसविण्यासह अन्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विठ्ठल अशोक जगताप असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. पुंगळा येथील अशोक जगताप यांचा विठ्ठल हा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी (दि.९) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तो आईसोबत मंदिरातून घरी परतत होता. यावेळी घराकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता एवढी होती की विठ्ठल सुमारे दहा ते पंधरा फूट अंतरावर फेकला जाऊन सिमेंट रस्त्यावर आदळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. जखमी विठ्ठलला तातडीने परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचारा दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान महामार्गावर वन-वे व्यवस्था करावी, गतीरोधक बसवावे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शालेय समिती, मुख्याध्यापक, ग्रामस्थांनी यापूर्वीच सार्वजनिक बांधकामच्या जिंतूर व नांदेड कार्यालयांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
अखेर सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावाचा बळी चिमुकल्याला गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विठ्ठलच्या मृत्यूच्या निषेधार्थ तसेच महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी लावून धरली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर सार्वजनिक बांधकामचे सहायक अभियंता शिवाजी बोरकर, नायब तहसीलदार प्रशांत राखे, मंडळ अधिकारी मोहसीन पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
अधिकाऱ्यांनी नांदेड येथील शाखा अभियंता मोघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुंगळा येथील महामार्गाची परिस्थिती व ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती दिली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तातडीने सिमेंटचे गतिरोधक बसविण्यात येतील. तसेच वन-वे व्यवस्था व अन्य सुरक्षात्मक उपाययोजनांबाबतही लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सादर करून रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र, केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.