

सेलू : धूलिवंदन सण म्हणजे रंगांची उूळण, मात्र सेलूत दोन दशके हा सण रंगांऐवजी मातीच्या सान्निध्यात, आरोग्यदायी पध्दतीने साजरा करण्याची परंपरा जपली जात आहे. गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.3) पारंपरिक मातीस्नानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. यंदा या अभिनव उपक्रमाचे 20 वे वर्ष पूर्ण झाले.
प्रारंभी हा उपक्रम चंद्रप्रकाश सांगतानी व गंगाधर शेरे पाटील यांच्या शेतात सुरू झाला होता. मागील तीन वर्षांपासून मंठा रोडवरील मालाणी यांच्या शेतातील ‘हॉटेल परिवार फार्म अँड ग्रो टुरिझम’ परिसरात संयोजक शिवनारायण मालाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मातीस्नानाचे आयोजन केले जाते. ग्रामीण, निसर्गरम्य वातावरणात होणारा हा सोहळा नागरिकांसाठी वेगळाच अनुभव ठरतो.
यावेळी सहभागी नागरिकांनी तीळ तेलाने अंगाला मालिश करून पारंपरिक पध्दतीने मातीचा लेप लावला. सुमारे तासभर उन्हात बसून माती सुकवण्यात आली. त्यानंतर सचैलस्नान करून शरीरशुध्दीचा अनुभव घेतला. मातीस्नानानंतर कडधान्यमिश्रित उसळ व आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक उपचारपध्दती, साधेपणा आणि आरोग्यस्नेही आहार यांचा संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.
शिवनारायण मालाणी, हितेश शहा, रेवा कुंदनानी, प्रवीण माणकेश्वर, आनंद बाहेती, वल्लभ राठी, सतीश जाधव, रोहित काला, भास्करराव घोडके, कैलासराव काळे, श्रीपाद रोडगे, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर, सुनील गायकवाड, बाबासाहेब हेलसकर, कृष्णा काटे, वाल्मिक घाडगे (परतूर), डिगांबर डोंबे, राम सुरवसे, रामकिशन कटारे, सुभाष मोहकरे, प्रेमगोपाल कासट (मंठा) आदींसह अनेकांनी सहभाग घेतला.
आरोही ढवळे, स्वराज जाधव, राघव व श्लोक काटे या चिमुकल्यांनीही मातीस्नानाचा आनंद लुटत सणाला वेगळीच रंगत आणली. यानिमित्त आयोजित गीत-संगीत कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. कृष्णा काटे, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर व वाल्मिक घाडगे यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. गणेश सिंग, विष्णू, करण सिंग, यश आचलिया आदी उपस्थित होते.
मृदास्नानाचे आयुर्वेदातील महत्त्व
मृदास्नानाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीळ तेलाने मालिश केल्यानंतर मातीचा लेप शरीरावर लावून तो उन्हात सुकवला जातो. यामुळे त्वचेची शुध्दी होते, शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि ऋतुचक्रानुसार शरीराला आवश्यक शारीरिक शुध्दीकरण मिळते, अशी माहिती संयोजक शिवनारायण मालाणी यांनी दिली. आरोग्य, अध्यात्म आणि सांस्कृतिक जपणूक यांचा त्रिवेणी संगम साधणारा हा उपक्रम सेलूच्या सामाजिक जीवनात वेगळी ओळख निर्माण करत असून, धूलिवंदन साजरे करण्याचा पर्यायी व आरोग्यदायी संदेश देत आहे.