

Salegaon Dist.Z P. School Classrooms leak due to rain
सेलू, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील साळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली असून पावसामुळे वर्गखोल्यांतून पाणी गळत आहे. अशा धोकादायक इमारतीत सध्या ८९ विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत ही अत्यंत गंभीर आणि प्रशासनाला जाग आणणारी बाब आहे.
सदर शाळेत एकूण ४ वर्गखोल्या असून त्यातील तीन खोल्या पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. मुख्याध्यापक कार्यालयालाही मोठमोठे तडे गेले असून इमारत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचे पाणी वर्गखोल्यांत साचत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण बनले आहे, परिणामी व्हरांड्यातच बसून शिक्षण घेण्याची वेळ त्यांच्यावर येवून ठेपली आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा पालक आणि ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेऊ शकतात असे स्पष्ट करण्यात आले.
या संदर्भात शालेय समिती उपाध्यक्षा सुरेखा आकात यांनी माहिती दिली की, जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदने दिली आहेत. प्रशासनाकडून प्रस्ताव मागविले गेले मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. जर लवकर पर्यायी व्यवस्था केली नाही तर आम्ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी ग्रामस्थांचीही मागणी आहे.