

Driver killed for not paying for drinking alcohol
मानवत, पुढारी वृत्तसेवा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने व जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील कोक्कर कॉलनी येथील टेम्पो चालकाचा कुदळीने डोक्यात वार करून निघृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. २६) दुपारी १ वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील झरी नाका परिसरातील हॉटेलात घडली.
ज्ञानेश्वर वैजनाथ पवार (वय ४४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारुती चव्हाण (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शहरातील कोक्कर कॉलनीत ज्ञानेश्वर पवार हे पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह राहत होते. त्यांच्याकडे टेम्पो असून तो भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
याच कॉलनीत मारुती चव्हाण हा त्याच्या कुटुंबासह राहत असून तो नेहमी दारूच्या नशेत राहून कॉलनीतील लोकांना दारू पिण्यासाठी पैसे मागत असतो. १० ते १५ दिवसांपूर्वी मारुती चव्हाण यांनी ज्ञानेश्वर पवार यांच्या घरी जावून दारू पिण्यासाठी पैसे मागून धिंगाणा केला होता.
तू मला बाहेर भेट तुला दाखवतो अशी धमकीही त्याने दिली होती. शनिवारी (दि. २६) दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पवार हे मित्रांसोबत चहा घेत बसले असता मारुती चव्हाण याने त्या हॉटेलमध्ये हातात कुदळ घेऊन जूवन पवार यांच्याशी वाद घालून भांडण केले. तसेच जवळ असलेल्या कुदळीने डोक्यावर वार करून तो पळून गेला असे तक्रारीत नमूद केले. नागरिकांनी जखमी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.