

आनंद ढोणे
पूर्णा : पूर्णा तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. जून महिन्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ थांबली होती. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, ज्वारी या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
जून महिन्यानंतर मोठा पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओल कमी झाली होती. त्यामुळे शेतातील पिके कोमेजून वाढ खुंटली होती. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. परंतु, शनिवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिके पुन्हा तरारली आहेत. हातची पिके जाण्याची भीती दूर झाली आहे.
जुलै महिन्यात २२३.८ मिमी सरासरी आवश्यक असताना २५ जुलैपर्यंत २४०.४ मिमी पाऊस झाला आहे. यंदा जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पाऊस झाला. मात्र, सध्या जोरदार पावसामुळे तुट भरून निघण्याची शक्यता आहे.
पावसामुळे खरीप हंगामाची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे. शेतकरी आता घरखर्च आणि शेतीच्या पुढील नियोजनाकडे वळले आहेत. शेतकऱ्यांच्या श्रमाला आणि आशेला पावसाने दिलासा दिला असून, आगामी काळातही असाच पाऊस सुरू राहिल्यास खरीप हंगाम यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील जुनामोंढा भागातील भाजी मार्केटमध्ये आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळी सुरुवातीला हलक्या सरी पडत असताना अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे विक्रेत्यांचे हाल झाले.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरातील काही गरीब महिला नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी दुकानं थाटून बसल्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले आणि वाहू लागले. परिणामी, विक्रेत्यांना आपला माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली.
वयोवृद्ध महिला छत्री लावून, अंग भिजवत, थंडीत कुडकुडत भाजी विक्री करत होत्या. मात्र, पावसामुळे ग्राहकांची वर्दळ कमी झाली आणि विक्रेत्यांना महागामोलाचा भाजीपाला विक्री न होता घरी परत न्यावा लागला.