

Pregnant Woman Death in Purna
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील २५ वर्षीय गर्भवती महिलेला चुकीच्या उपचारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सुचिता गोपीनाथ कदम हिला प्रसूती सिझर शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान, तिला चुकीच्या उपचारामुळे गंभीर रिऍक्शन येऊन ८ डिसेंबररोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोन्ना व चुडावा गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मृत महिलेचा पती गोपीनाथ किशनराव कदम यांनी ९ डिसेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, सुचिता कदम यांचा उपचार मागील काही महिन्यांपासून नांदेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू होता. ८ नोव्हेंबररोजी तपासणीसाठी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी १० नोव्हेंबर रोजी डिलीव्हरी करण्याचे सांगितले. रुग्णास कोणतीही वेदना नसतानाही त्वरित सिझर करण्याची सूचना देण्यात आली. रक्ताची पिशवी चढवताना आवश्यक तपासण्या न करता आणि तज्ञ डॉक्टर न उपस्थित राहता नर्सकडून रक्त दिले गेले, ज्यामुळे रुग्णाला गंभीर रिऍक्शन झाली.
यानंतर रुग्णावर ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सिझर आणि कुटुंब नियोजन अशा दोन शस्त्रक्रिया केल्या. दोन्ही शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला, परिणामी ती बेशुद्ध झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, आणि नंतर हैद्राबाद येथील हॉस्पिटलमध्ये पाठवले. मात्र, रुग्णाची प्रकृती सुधारली नाही आणि ८ डिसेंबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे दुषित रक्ताचे गाठी तयार झाल्या होत्या, आणि हेच मुख्य कारण बनले. या प्रकरणात सुमारे २५ लाख रुपये खर्च झाला असूनही रुग्णाचा जीव वाचवता आले नाही. सुचिता कदम यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या पती, आई-वडील, आणि २ वर्षांचा मुलगा व नवजात बाळावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.