Illegal Sand Purna | पूर्णा नदीपात्रातून गाढवावरून अवैध रेतीची वाहतूक; महसूल अधिकाऱ्यांची कारवाई
Purna river sand mining
पूर्णा: पूर्णा नदीपात्रात अवैध रीतीने वाळू उत्खनन करून ती गाढवांवरून वाहतूक करत असताना मंगळवारी (दि. ९) दुपारी १:३० वाजता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई केली. तहसीलदार माधवराव बोथीकर आणि उपतहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी कल्याण धोंगडे घटनास्थळी दाखल झाले.
या कारवाईदरम्यान, महसूल पथकातील तलाठी धोंगडे यांनी पाच-सहा गाढवांवरील रेती जप्त केली. मात्र, गाढवावरून रेती वाहतूक करणारे काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. ही वाळू शहरातील बांधकामासाठी विकली जाण्याच्या उद्देशाने अनधिकृतरीत्या नदीपात्रात उत्खनन करून गाढवांच्या साहाय्याने वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक महसूल प्रशासनाकडून पूर्वी या व्यवहाराकडे फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे गाढवांवरून रेती वाहतूक करणं उघडपणे चालले. गाढव हे प्राणी असल्याने अनेकजण याबाबतची कारवाई टळेल असा समज घेऊन वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. तथापि, तलाठी धोंगडे यांच्या कारवाईमुळे गाढवांवरून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणू लागले आहेत.
दरम्यान, शहरात मोकाट सोडण्यात आलेली गाढवं राहदारीस अडथळा निर्माण करत आहेत. रेती उपसा चालू नसताना हे गाढव शहरात वावरत कुठेही उच्छाद मांडतात, ज्यामुळे रहदारीस मोठा त्रास होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही कारवाई दीर्घकाळ टिकेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

