

Police catch two suspects before theft; blockade in Manavgat
मानवत, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी मध्यरात्री दोन स्वतंत्र कारवायांत दोन संशयितांना जेरबंद करत संभाव्य चोरीचे प्रयत्न हाणून पाडले. पोलिसांच्या दक्षतेमुळे शहरातील चोरीचे प्रयत्न रोखण्यात यश आले.
दरम्यान पोलिसांनी पहिली कारवाई परभणी रोडवर लपून बसलेला इसम पकडला. दि. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१० वाजता सपोनि संदीप बोरकर व पथक मानवत-परभणी रोडवरील रूढी पाटी परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका झाडाच्या आडोशात एक इसम मोटरसायकलसह लपून बसलेला आढळला. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
चौकशीत त्याने अजय राजेभाऊ पाते (रा. कोथाळा ता.मानवत) असे नाव सांगितले. त्याच्याकडील मोटरसायकल एमएच २२ के १६७६ जप्त केली असून तो घरफोडी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेला होता असे पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई शिवाजीनगर भागात दबा धरून बसलेला संशयित पकडला.
याच दिवशी पहाटे १ वाजता पोलिस कर्मचारी नारायण सोळंके व पथकाने शिवाजीनगर भागात पेट्रोलिंग दरम्यान आणखी एक संशयित पकडला. तो अंधाराचा फायदा घेत झाडाच्या आडोशात लपून बसला होता. चौकशीत त्याने रणजितसिंग निर्मलसिंग टाक (वय ५५, रा. आठवडी बाजार मानवत) असे नाव सांगितले.
तोही चोरी व घरफोडी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही संशयितांना अंधाराचा फायदा घेत चोरीसाठी दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी वेळेत कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. तपास पोह जी. एच. शेख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.