

Selu Valur village Robbery Case
परभणी : सेलू तालुक्यातील वालुर शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाचा खून करून दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) मध्यरात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास बोरी रोडलगतच्या वालुर शेतशिवारात घडली.
आसाराम रानबा सोनवणे (वय 52, रा. वालुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे (वय 24) हा शेतातील आखाड्यावर झोपला असताना दोन ते तीन अज्ञात दरोडेखोरांनी गजासारख्या हत्याराने संतोषच्या डोक्यात आणि मानेवर वार करून त्याचा खून केला.
त्यानंतर फिर्यादीची आई वच्छलाबाई सोनवणे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण 30 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरून नेला. याच दरम्यान जवळच असलेल्या कृष्ण मंदिरात राहत असलेल्या दत्तात्रेय भोकरे व सरुबाई भोकरे यांनाही दरोडेखोरांनी मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करीत आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी बेनिवाल (जिंतूर), उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे (सेलू) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या घटनेमुळे वालुर परिसरात भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.