

परभणी/बोरी : बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी रोहिला (ता.जिंतूर) येथे फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. ही घटना मंगळवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास घडली. बोरी पोलिसांच्या वेळेवर दाखल झालेल्या पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व पीएसआय एस.एम.थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी विशाल विठ्ठल डुकरे (वय २३) यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध, तर शेख मोहसीन शेख आजम (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांतील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी रात्री उशिरा पिंपरी रोहिला येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षक परदेशी यांनी स्वतः पहाटेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. याप्रकरणी तपास पीएसआय थोरवे हे एपीआय सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. घटनेचा अचूक सुगावा लागावा, यासाठी मोबाईल फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून चारठाणा, गंगाखेड, सेलू आणि मानवत येथून अतिरिक्त पोलीस फौज तसेच दंगा नियंत्रण पथक गावात दाखल करण्यात आले आहेत. सध्या पिंपरी रोहिला व परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे.