

सुभाष कच्छवे
परभणी : जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेले व एकमेकांवर आरोपाची राळ उडवणारे महायुतीतील भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना झेडपीच्या सत्तेमध्ये एकत्रितपणे सहभागी होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामी आल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे महायुतीतील तिन्ही घटक पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. भाजपाने तब्बल ४९ जागेवर उमेदवार दिले होते. जिल्हा परिषदेच्या ५४ गटांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तुल्यबळ लढती झाल्या होत्या. प्रामुख्याने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी तीव्र सत्ता संघर्ष झाला होता.
जिंतूर तालुक्यातील १० पैकी ६ जागांवर तर सेलू तालुक्यातील संपूर्ण पाचही जागांवर विजय मिळवत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपले नेतृत्व सिध्द करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. विजय भांबळे यांना हावाडा दिला होता. निवडणुकीदरम्यान पालकमंत्री बोर्डीकर व आ. राजेश विटेकर यांच्यातील वादही उफाळून आला होता. जिल्हा परिषद निकाल आल्यानंतर २४ जागा पटकावत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष
बनला. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला ६ तर शिंदे सेनेला ५ जागा मिळाल्या. निकालानंतर आम्ही शिंदे सेनेसोबत युती करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू असा दावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला होता. भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील बोलणी फिस्कटते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी यशस्वी शिष्टाई केल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाकडे राहणार असून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह एक सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शिंदे सेनेला १ तर आ. रत्नाकर गुट्टे यांच्या एका समर्थकाला सभापतिपद देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दि.२० मार्चच्या आत पार पाडावयाची असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषद स्थापनेनंतर प्रथमच परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे.
स्वीकृत सदस्यांसाठी चढाओढ
५४ जिल्हा परिषद सदस्य संख्या असलेल्या परभणी जिल्हा परिषदेत संख्याबळानुसार ५ स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपा व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रथमच स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार असून यात पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.