

परभणी : परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून राजकारण तापले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली. महायुतीचीच झेडपीवर सत्ता येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेलाही सभापती पदाची लॉटरी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर तब्बल 64 वर्षांनंतर परभणी झेडपीवर भाजपचा झेंडा फडकणार असून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वालाही झळाळी मिळणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत 24 जागा पटकावत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनला होता. त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5, काँग्रेसला 3 तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.
जिल्हा परिषद निकालानंतर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हा परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने झेडपीत सत्ता स्थापन करू, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही असे विधान केले होते. तदनंतर शिंदे सेना व भाजपमध्ये सुरू असलेली बोलणी अवास्तव मागण्यांमुळे फिसकटलीही होती. तद्नंतर झेडपीच्या सत्ताकारणात पालकमंत्री बोर्डीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधक एकवटणार असून शिंदेच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात येणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता.
भाजप वगळता विरोधी पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना ठाणे येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सर्वाधिक मोठा पक्ष बनूनही जिल्हा परिषदेत भाजप सत्तेपासून दूर राहते की काय? अशी चर्चा सुरू होती. याचवेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा परिषदेत भाजपाचीच सत्ता येणार, असे वारंवार सांगत होते.
अखेर मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे जात परभणी जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असून भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष बसेल असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेडपीच्या सत्ताकारणावरून यशस्वी शिष्टाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसणार असल्यामुळे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्ो नेतृत्वही सिद्ध झाले आहे.
दै. पुढारीने प्रकाशित केले होते वृत्त
जिल्हा परिषदेच्या सत्तेत महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना सहभागी होणार असल्याचे वृत्त दै. पुढारीने 1 मार्च2026 अंकामध्ये प्रसिद्ध केले होते. तद्नंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना सामोरे जात परभणी जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे दै. पुढारीच्या वृत्ताची सत्यता सिद्ध झाली आहे.