

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी शिवारात गोरेगाव पोलिसांच्या पथकाने एका शेतात छापा टाकून कांद्याच्या पिकात लावलेली गांजाची 80 झाडे जप्त केली आहे. या गांजाची किंमत सुमारे 85 ते 90 हजार रुपये आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्याविरुध्द गोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कारवाईची मोहीम सुरू आहे. पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच 13 पोलिस ठाण्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई केली जात आहे.
दरम्यान सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी शिवारात एका शेतकऱ्याच्या श्ेतात कांद्याच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, राहुल मैंदकर, नवले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारपासूनच शोध मोहीम हाती घेतली होती.
तब्बल तीन तासांनंतर पोलिसांनी गुगुळपिंपरी शिवार फिरल्यानंतर विठ्ठळ ढोक याच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने पाहणी केली असता काही झाडे तीन ते चार फूट तर काही झाडे दोन फुटांपर्यंत वाढली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 80 झाडे जप्त केली आहेत. या झाडांचे वजन साडेआठ किलो भरले असून त्याची किंमत 85 ते 90 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी उपनिरीक्षक नितीन लेनगुळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी विठ्ठल ढोक (रा. माहेरखेडा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक झळके, उपनिरीक्षक लेनगुळे पुढील तपास करीत आहेत.