![परभणी: मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला ३ दिवसांची कोठडी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%A1%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: मामाच्या घरी राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला पळवून नेले. दरम्यान, पोलिसांच्या धास्तीने मुलीला पळवून नेणारा तरुण पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२८) हजर झाला होता. ही घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली होती. या तरुणाला आज (दि. २९) पूर्णा येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील मामाच्या घरी राहणारी अल्पवयीन मुलगी आनंदनगर येथील संगणक सेंटरमध्ये एमएससीआय टी कोर्सचे शिक्षण घेत होती. या मुलीला ऋषिकेश नामदेव पवार (रा. शेखराजूर, ता पालम) याने फूस लावून पळवून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुलीला पळवून नेलेल्या तरुण आणि पीडित मुलीचा कसून शोध सुरु केला होता. यात ऋषिकेश व मुलीचाही मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत होत्या. पोलिसांचा तपास सुरू असताना ऋषिकेशने त्याच्या बहिणीशी मोबाईलवरून संपर्क साधल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे तपास केला असता गंगाखेड परिसरात ऋषिकेशचे लोकेशन मिळाले.
पोलिस आपल्या मागावर असल्याच्या माहिती मिळताच तरुण मुलीसह नातेवाईकांच्या मदतीने २८ मेरोजी पूर्णा पोलिस ठाण्यात हजर झाला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तिला आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तर तरुणाला न्यायालयात हजर केले असता १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रेखा शहारे, कुरील करत आहेत.
हेही वाचा