

ताडकळस : पुर्णा या परीसरातील बाजार पेठेच मुख्य मिनी शहर असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम काम पूर्ण झाले असून त्या इमारतीत आरोग्य केंद्राची कामकाज सुरू होऊन जवळपास एक वर्ष झाले आहे. परंतु, या ठिकाणी शस्त्रक्रिया गृहाचे काम सर्व सोयीसुविधा युक्त झालेले असताना देखील या केंद्रात शस्त्रक्रिया अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.
इमारतींचे नवीन बांधकाम पूर्ण व इमारतीत आरोग्य सेवा चालू झालेली असताना देखील ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या लिमला, फुलकळस, बलसा बु, निळा, चार उपकेंद्रातील कार्य क्षेत्रातील गावातील नागरिकांची गैरसोय होते. विशेष करून महिलांना ते गैरसोयीचे ठरतेय.
ताडकळस हे केंद्र सोयीचे असताना देखील गेल्या चार ते पाच वर्षांपासून शस्त्रक्रिया जुन्या इमारतीमध्ये चालू होती. परंतु इमारत जीर्ण झाली असल्याकारणाने येथील शस्त्रक्रिया देखील बंद करण्यात आली होती. धानोरा काळे, किवा एरंडेश्वर, कंठेश्वर याठिकाणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी जावे लागत आहे.
ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत पूर्ण होऊन १ ते २ वर्ष झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याकडे लक्ष देऊन येथील नव्या इमारतीचे कामकाज सुरु करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ताडकळस व परिसरातील ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील त्रस्त महिला व नागरिकांनी केलीय.