Parbhani Crime : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे १० लाखांचा गुटखा जप्त, परभणी पोलिसांची कारवाई!

दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Parbhani Crime : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे १० लाखांचा गुटखा जप्त, परभणी पोलिसांची कारवाई!
Parbhani Crime : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे १० लाखांचा गुटखा जप्त, परभणी पोलिसांची कारवाई!
Published on: 
Updated on: 

सोनपेठ : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध परभणी पोलिसांनी धडक कारवाई केली. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील बसस्थानकाजवळ केलेल्या या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल १० लाख ९७ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी दि. १७ नोव्हेंबर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव बसस्थानकाजवळ प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित बोलेरो पिकअप (क्र. एमएच २२ एएन १९६१) या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष मुद्देमालाची मोजणी करून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह बोलेरो पिकअप वाहन जप्त केले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये केसरयुक्त विमल पानमसाल्याचे विविध पॅक, काळ्या रंगाच्या तंबाखू पुडे आणि किंग पॅक तंबाखूचा समावेश आहे. यामध्ये पाच लाख रुपये किमतीच्या बोलेरो पिकअप वाहनाचाही समावेश असून, एकूण जप्तीची किंमत १० लाख ९७ हजार ९३६ रुपये आहे. या प्रकरणी बालाजी वैजनाथराव काळे (रा. शेळगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) आणि अरबाज खान मोबीन खान (रा. गंगाखेड, जि. परभणी) यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संदीप आशोकराव चौरे (फिर्यादी), पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद वड, रामकिशन काळे, देविदास बुकरे, पोलीस शिपाई शरद सावंत आणि वाहनचालक संदीप साळवे यांनी केली. तसेच पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक टर्के, पोलीस हेडकॉन्स्टेबल चुडावकर, यशवंत वाघमारे, वाव्हळे आणि सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश नामदेव मेहेत्रे यांचा सहभाग होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गीत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश नामदेव मेहेत्रे करीत आहेत. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.