

परभणी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणातून चार आवर्तने पाणी सोडण्याच्या आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून रब्बी पेरणीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
बैठकीत आ. पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता मांडली. जायकवाडीतून पाणी न सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन रब्बीच्या पेरण्या खोळंबणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची दखल घेत जलसंपदा मंत्र्यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी जायकवाडीतून पहिले आवर्तन सोडले जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर महिन्याच्या अंतराने आणखी दोन आणि उन्हाळ्यात पिण्यासाठी चौथे आवर्तन सोडण्यात येईल.
या बैठकीत आ. पाटील यांनी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील ४७ पैकी ४५ रिक्त असलेली अभियंत्यांची पदे तातडीने भरण्याची मागणीही केली. यावर जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीनंतर आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांनी पाण्याचा स्प्रिंकलरद्वारे जपून वापर करावा, असे आवाहन केले आहे.
जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या कालव्याचे अनेक वर्षांपासून अस्तरीकरण न झाल्याने ४० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे टेलच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. टेलच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी २०८ किलोमीटरच्या कालव्याचे तातडीने अस्तरीकरण करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.