

मानवत : परभणी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3200 द्यावी या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी ता 8 मानवत तालुक्यातील मंगरूळ पाटीवर कारखान्याला जाणाऱ्या ऊस वाहतूकदारांच्या वाहनातील हवा सोड आंदोलन करण्यात आले.
सदरील ऊस वाहतूक करणारी वाहने माजलगाव तालुक्यातील जय महेश शुगरली या कारखान्याला जात होती. गेल्या आठवड्यात तालुक्यातील सारंगापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे जिल्ह्यातील ऊस कारखानदारांनी ऊसाला पहिली उचल 3200 रुपये जाहीर करावी अन्यथा कारखाने सुरुळीत चालू होऊ देणार नाही. तसेच ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक रस्त्यावर आणू नये अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरी देखील जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला 3200 रुपयाची पहिली उचल अद्याप जाहीर झाली नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
या आंदोलनात विठ्ठल चोखट, किसन शिंदे, रणजीत चव्हाण, संतोष जोगदंड, मारोती तुपसमिंद्रे, अण्णासाहेब चोखट, संजय चोखट, तुकाराम चव्हाण, ओंकार लाडाने, किशोर जाधव, कारभारी जोगदंड, लक्ष्मण पाते , विनोद गोंगे, सुधाकर जोगदंड, प्रकाश झाडे, श्रीमंत डोंगरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते.