

मानवत : निवडणूक विभागात काम करत असताना एका लिपीकाने संगणकमध्ये नवीन फोल्डर तयार करून फोल्डरमध्ये अंतिम मतदार यादीचे फोल्डर कॉपी व जतन केले. त्यानंतर त्याने या अंतिम मतदार यादीची सॉफ्ट कॉपी फोटोसहित कार्यालयाबाहेरील व्यक्तींना आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून पाठविले. याप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक महेश गायकवाड यांनी या लिपीकावर कारवाईचा बडगा उगारत त्याला सेवेतून निलंबित केले. सचिन सोनवणे असे या लिपीकाचे नाव असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी गुरूवारी (दि.६) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
याबाबत माहिती अशी की, मानवत नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेचे लिपिक सचिन सोनवणे यांना मतदारयादी बिनचूक तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मतदारयादी प्रभागनिहाय तयार करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन निवडणुकीचे काम अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे असल्यामुळे आयोगाचे व शासनाचे आदेशानुसार कामकाज करण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. निवडणूक याद्याचे काम सुरू असताना सचिन सोनवणे यांनी एक नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास नगरपालिका कार्यालयात संगणकामध्ये एक नवीन फोल्डर तयार केला. व त्या फोल्डरमध्ये अंतिम मतदार याद्याचे फोल्डर कॉपी करून जतन करून अंतिम फोटोसहीत मतदार यादी काही व्यक्तींना व्हाट्सअपद्वारे पाठवली.
ही यादी व्हायरल झाल्याने शहरात राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी २ नोव्हेंबर रोजी याबाबत कडक कारवाई करत सचिन सोनवणे याचे सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबन केले. यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.