

परभणी: शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास आभाळ फाटल्यासारखा ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या काही तासात शहरातील सखल भाग जलमय झाले असून, अनेक वस्त्यांतील शेकडो घरांमध्ये पाणी घुसले. परिणामी, नागरिकांची झोपमोड होऊन मोठ्या प्रमाणावर संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या मंडळातील शिल्लक राहिलेली पिके ही पूर्णपणे पाण्यात बुडत असल्याचे परिस्थिती आहे.
रविवारी (दि.५ ऑक्टो.) मध्यरात्रीनंतर हवामानात अचानक बदल झाला आणि पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी तडाख्यामुळे शहरातील चोहोबाजूंच्या वसाहतीसह वसमत रोड, बस स्थानक परिसर व अन्य काही भागातील सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले. काही घरांमध्ये तर दीड ते दोन फूटांपर्यंत पाणी भरले. नागरिक झोपेत असताना घरात पाणी घुसल्याने घाबरून गेले. कपडे, धान्य, विद्युत उपकरणे, फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले, काही ठिकाणी गॅस सिलेंडर तरंगताना दिसून आले.
शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौक, जसे की बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, गांधी पार्क हे पूर्णतः पाण्याखाली गेले होते. गुडघाभर पाण्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती, काही दुचाकी पाण्यात अडकल्या. सकाळी कार्यालयीन वेळेत नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांनी महापालिका, अग्निशमन विभाग व पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. काही ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आले, तर काही ठिकाणी अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र, पावसाचा जोर व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता ही मदत अपुरीच ठरत आहे, असे नागरिकांनी सांगितले.
पहाटे ४ वाजल्यापासून अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात मुसळधार पाऊस झाल्याने परभणी तालुक्यातील पेडगाव, आव्हाडवाडी, किनोळा, आर्वी, कुंभारी, कारला, कास्टगाव, पिंपळगाव, गोविंदपूर, सनपुरी, वाडी व परिसरातील अनेक गावांमध्ये कमरेइतके पाणी वाहू लागले.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केली असल्याचा दावा केला होता. मात्र, आजच्या पावसाने हे दावे हवेत विरल्याचे स्पष्ट झाले. अनेक भागांत नाले तुंबल्यामुळे पाणी रस्त्यांवर साचले. नागरिकांनी महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.
घरात अचानक पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. काहींचे धान्य, कपडे, शालेय साहित्य, कागदपत्रे वाहून गेली आहेत. पहाटे उठलो तेव्हा घरात गुडघाभर पाणी भरलेलं होतं. मुलांचे पुस्तकं, कपडे, भांडीसुद्धा वाहून गेली. काहीच उरलं नाही अशी व्यथा एका रहिवाशाने सांगितली.
परभणी शहराला दरवर्षी अशा पावसाचा तडाखा बसतो, याची माहिती असूनही यंदाही प्रशासन अपुरं सिद्ध झालं आहे. आता तरी प्रशासनाने धडा घेऊन तात्काळ सखल भागात निचऱ्याच्या सोयी, तात्पुरती निवारा व्यवस्था व आरोग्य विभागाच्या तैनातीसह उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
परभणी तालुक्यातील परभणी मंडळात ६८.८मिमी, पेडगाव ६८.३ मिमी, जांब ६८.३ मिमी, टाकळी कुंभकर्ण ८६.५ मिमी, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी ७२.३ मिमी, माखणी ६६.५ मिमी, पूर्णा तालुक्यातील लिमला ६६.३ मिमी, चुडावा ६८.५ मिमी, पालम तालुक्यातील पालम ७६.० मिमी, पेठशिवणी ९९.३ मिमी, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव ११२.३ मिमी, वडगाव ८१.८ मिमी अशाप्रकारे पावसाची नोंद प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील आवलगाव (११२.३ मिमी) व पेठशिवणी (९९.३ मिमी) येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत काही भागांत पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.