

पैठण: नाशिक आणि नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक सुरूच असल्याने जायकवाडी (नाथसागर) धरणातून गोदावरी नदीत करण्यात आलेल्या विक्रमी विसर्गामुळे पैठण शहरावर पूरस्थितीचं संकट ओढावलं आहे.
रविवारी (दि.२८) रात्री केलेल्या अवाढव्य पाण्याच्या विसर्गामुळे शहरातील अनेक सखल भागांत आणि मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. आज सोमवारी (दि.२९ सप्टें.) रोजी सकाळीही नाथसागर धरणाच्या २७ दरवाज्यांतून १ लाख ८८ हजार ६४० क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे.
धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सखल भागांतील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या घरात व दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाणी वाढल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली असून, दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने शहरवासीयांचे मोठे हाल होत आहेत.
रात्री नाथसागर धरणातून सोडलेल्या पाण्याची धास्ती घेऊन अनेक नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले. स्थानिक प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सखल भागातील नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला. खाण्यापिण्याची समस्या: या निवाऱ्याच्या ठिकाणी खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक स्वयंसेवक संघटनांनी बाधित नागरिकांना अल्पोपहार वाटप केला.
पूर परिस्थितीमुळे गोदावरी नदीवरील पाटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने शेवगाव आणि अहिल्यानगरचा संपर्क तुटला आहे. तसेच, नवगाव येथील वीरभद्रा नदीच्या पुलावर पाणी आल्याने शहागड-गेवराईकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. एस.टी. महामंडळानेही पैठण-शहागड, गेवराई, बीड, शेवगाव, अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे, अशी माहिती आगार प्रमुख गजानन मडके यांनी दिली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी साचले असून, नागरिक आणि लहान मुले या पाण्यात जाताना दिसत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी पाण्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दुपारनंतर पाण्याची आवक कमी झाल्यास धरणातून सोडलेला विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.