Purna Railway Station | पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवाशाला गाडीतून ओढून बेदम मारहाण; गंभीर जखमी युवकाला नांदेडला हलविले

रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयासमोरच हल्ला; , सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Purna Train Passenger Attack

पूर्णा : पूर्णा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर एका प्रवासी युवकाला रेल्वे डब्यातून खाली ओढून सात ते आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली. या हल्ल्यात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत तो फलाटावर बेशुद्ध पडला. विशेष म्हणजे, रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असल्याने स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव दीपक राजेंद्र ढगे (वय २७, रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) असे आहे. दीपक हा अकोला-परळी पॅसेंजर रेल्वेगाडी क्रमांक ७७६१३ मधून प्रवास करीत होता. ही गाडी पूर्णा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर थांबलेली असताना सात ते आठ जणांच्या अज्ञात टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी त्याला डब्यातून खाली खेचत बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

Crime News
Parbhani News: गोठ्यातील गाई-म्हशींवर गुंडांचा राक्षसी हल्ला; डोळ्यात, गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसले; दोन जनावरांचा मृत्यू 

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार भीमराव छापेवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पासवान यांना बोलावून घेतले. त्यानंतर जखमी दीपक याला पूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा हल्ला झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असताना आणि सुरक्षा यंत्रणेचे कार्यालय जवळच असतानाही युवकाला गाडीतून खेचून मारहाण करण्याचे धाडस हल्लेखोरांनी केले, ही बाब गंभीर मानली जात आहे. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, घटनेच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

Crime News
Parbhani News | बरबडी शिवारात स्फोटक साठा; पांगरा येथील शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पूर्णा रेल्वेस्थानकावर मारहाण, पाकीटमारी, मोबाईल चोरी आणि प्रवाशांना लुटण्यासारख्या घटनांबाबत वारंवार तक्रारी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सुरक्षा गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. काही प्रवाशांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही तक्रारी केल्या आहेत. या आरोपांची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

या घटनेची नांदेड रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची भूमिका तपासावी आणि हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चौकशीतून समोर आल्यास संबंधितांवरही नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news