

Purna municipal council anti-encroachment
पूर्णा : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील संरक्षण भिंतीलगत मुख्य रस्त्याच्या कडेला नाल्यावर उभारलेली खानावळी, हॉटेल्स व पानटपरी यांसारखी अतिक्रमणे मंगळवारी (दि. २४) दुपारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने ही धाडसी मोहीम राबवली.
या कारवाईत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृष्ट गुट्टे, मुंमतजीत खान, पारवे, उत्तम कांबळे, प्रतीक चव्हाण, सिव्हिल इंजिनिअर ए. हकीम खय्युम, संजय दिपके, दिनेश मुळे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, प्रकाश इंगोले, पडलवार तसेच महिला अधिकारी रेखा शहारे व मंजुषा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात होता.
महावीर नगर येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील संरक्षण भिंतीलगत काही व्यावसायिकांनी मागील काही वर्षांपासून नाल्यावर अतिक्रमण करून दुकाने उभारली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी पालिकेकडून शहरात स्पीकरद्वारे सूचना देऊन अतिक्रमणधारकांना स्वतःहून दुकाने हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काहींनी सकाळीच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही ठिकाणी प्रशासनाने थेट कारवाई करत जेसीबीद्वारे दुकाने हटवली व साहित्य ट्रॅक्टरमध्ये जप्त करण्यात आले. या वेळी एका अतिक्रमणधारकाने न्यायालयीन स्थगिती आदेश दाखवत कारवाई थांबवण्याची विनंती केली; मात्र प्रशासनाने ती नाकारत मोहीम सुरूच ठेवली.
या कारवाईदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रिया पाहिली. पालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.