

Purna election EVM sealing process
पूर्णा : पूर्णा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ 'ब' आणि प्रभाग १० 'ब' या दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी ( दि.१८ ) तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम (EVM) मशीन सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी एकूण ६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रक्रियेसाठी ६ मुख्य ईव्हीएम आणि २ अतिरिक्त (राखीव) अशा एकूण ८ यंत्रांची पडताळणी करून ती सीलबंद करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव बोथीकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत थारकर, डॉ. उत्कर्ष गुट्टे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या इतर जागांसाठी २ डिसेंबर रोजीच मतदान पार पडले होते. मात्र, प्रभाग १ 'ब' आणि १० 'ब' मधील उमेदवारांनी प्रचारासाठी वाढीव वेळ मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या दोन जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रभाग १ 'ब' (सर्वसाधारण): येथे एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे जाकीर कुरेशी, शिवसेना (उबाठा) कडून शेख जावेद, एमआयएमचे मोहम्मद अखिल, 'आप'चे शेख गाझी यांसह अपक्ष आणि इतर पक्षीय उमेदवारांचा समावेश आहे. या प्रभागात ३,१२० मतदार आहेत.
प्रभाग १० 'ब': येथे काँग्रेसच्या उषा दवणे आणि यशवंत सेनेचे सुनील जाधव यांच्यात थेट लढत आहे. या प्रभागात २,४३० मतदार आहेत.
मतदानाची वेळ: शनिवार, २० डिसेंबर (सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०)
मतमोजणी: रविवार, २१ डिसेंबर (सकाळी १० वाजेपासून तहसील कार्यालयात)
याच दिवशी नगराध्यक्षांसह सर्व २३ जागांचा निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील आणि पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.