

Nagpur Winter Session
पूर्णा : मनरेगा व विविध शासकीय योजनांमधील अडचणींमुळे त्रस्त झालेल्या पांगरा (पूर्णा) तसेच इतर गावांमधील शेतकऱ्यांनी थेट नागपूर गाठत हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर १२ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये बाबाराव ढोणे, विकास जाधव, मधूकर कांबळे, नारायण लोखंडे यांसह इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनरेगा योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक गावांमध्ये मंजूर कामांना प्रत्यक्ष सुरूवातच झालेली नाही. एका गावात वीसपेक्षा जास्त वैयक्तिक कामांना मंजुरी न दिल्याने अनेक शेतकरी अपुऱ्या कामांमुळे अडकून पडले आहेत.
तांत्रिक प्रक्रिया, चुकीची धोरणे आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे लाखो मजुरांना रोजगार हमीचा लाभ मिळणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मनरेगातील “२० कामांच्या मर्यादेचा” अडथळा तातडीने दूर करावा, या प्रमुख मागणीसह शेतकरी यशवंत स्टेडियम परिसरात आमरण उपोषण करत आहेत.
जॉबकार्ड लाभार्थ्यांसाठी 7 लाख रुपयांची मर्यादा वाढवावी
थांबलेली सर्व मनरेगा कामे तातडीने सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी व सीईओ जिल्हा परिषद यांना आदेश द्यावेत
तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई
लाभार्थ्यांचे मस्टर झिरो करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
मनरेगातील वैयक्तिक कामांवरील “२० कामांचा लॉक” तात्काळ रद्द करावा
मराठवाड्यातील गटविकास अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनियमितता, भ्रष्टाचार व दिरंगाईची चौकशी करून कारवाई
सिंचन विहीर, गाय-गोठा, कुशल मनुष्यबळ आदी अनुदानाच्या रकमा तातडीने वितरीत कराव्यात
शेतकऱ्यांचे अर्ज “मस्टर झिरो/अर्ज झिरो” करण्याच्या गैरप्रकारांवर तत्काळ कार्यवाही
गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कथित बेकायदेशीर सामूहिक रजेची विभागीय चौकशी
प्रलंबित प्रस्ताव—गायगोठा, सिंचन विहीर, वृक्षलागवड—तात्काळ मंजूर करावेत
गावपातळीवरील वाढत्या वन्यप्राणी उपद्रवावर तातडीने बंदोबस्त
घरकुल लाभार्थ्यांना थकलेले अनुदान तातडीने देण्यात यावे