

तळणी ः मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून टाकळखोपा, भुवन, सासखेड, वाघाळा, कानडी, खोरवड यासह अनेक गावांत अवैध वाळू उपसा व वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाळु चोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे ड्रोनसह विविध यंत्रणा असतांनाही वाळु चोरीला लगाम घालण्यात अपयश येत असल्याने महसुलचे ड्रोन पुर्णा नदी पात्रात डोकावणार कधी असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
पूर्णा पाटी ते तळणी रस्त्यावर रात्री दोन वाजता अवैध वाळू वाहतूक जोरात सुरु आहे.या मार्गावर काही वेळेस टम्पो पकडले जातात मात्र त्यानंतर ते कारवाई न करता सोडले जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार प्रशासनाच्या विश्वासार्हतेला धक्का देणारा असून, अवैध वाळू माफियांना अभय देणारा ठरत असल्याचा आरोप होत आहे.
पूर्णा नदीच्या पात्रातून होत असलेल्या यावेद्य वाळू उत्खननाकडे संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.े मंडळ अधिकारी व तलाठी अवैध वाळुवर कारवाई करीत नसल्याने वाळू माफियांचा वाळुचोरी व वाहतुकीचा रात्रीस खेळ जोरात सुरु आहे.तहसिलदार व पोलिस प्रशासनही वाळु माफीयांवर कारवाई करण्याबाबत फारसे आग्रही नसल्याने वाळु चोरांचे फावत आहे.
सध्या वाळू चोरांनी वाळू चोरीची वेळ बदलली असून रात्री अकराच्या नंतर हा वाळू चोरीचा खेळ सुरू होत आहे. विशेष बाब म्हणजे किनी द्वारे दिवसभर नदी पात्रातुन वाळूचा साठा केल्या जात आहे. रात्री जेसीबी यंत्राद्वारे टेम्पो मध्ये भरून वाहतूक केले जाते. पूर्णा नदी पात्रात पाणी असल्याने किनी द्वारे अनेक ठिकाणी वाळू उत्खनन सुरू आहे. मंठा तहसीलदार सुमन मोरे यांना या बाबत विचारले असता त्यांनी संबंधित वाळू घाटाचे ताबे लिलावधारकांना देणार असल्याचे सांगितले.
11 घाटांचे लिलाव
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील आतापर्यंत 11 वाळू घाटांचे लिलाव तीन टप्प्यांत पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप एकाही वाळू घाटाला प्रत्यक्ष उत्खनन सुरू करण्याची अधिकृत परवानगी मिळालेली नाही. असे असतानाही नदीपात्रातील विविध ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.