

Purna Illegal Sand Mining
पूर्णा : पूर्णा तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने मागील दोन ते तीन दिवसांत अवैध वाळू तस्करीविरोधात जोरदार मोहीम राबवून वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून अनेक वाहने व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तहसीलदार प्रशांत थारकर सध्या परभणी महानगरपालिका निवडणूक कामासाठी नियुक्त असतानाही, कामकाज आटोपून पूर्णेकडे परतताना अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर व तहसीलदार बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी तहसीलदार भारत गंगावणे, मंडळ अधिकारी अशोक भंवर, तलाठी खिल्लारे, कोतवाल शिवप्रसाद देवणे, मुरली मोरे व साईनाथ दाढे यांचा समावेश असलेल्या महसूल पथकाने कारवाई सुरू केली.
या मोहिमेदरम्यान बलसा (बु.) परिसरात वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडण्यात आले. तसेच मुंबर व कान्हेगाव शिवारातील नदीपात्रातून केनी साहित्य व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. वझूर व कळगाव येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून काही ब्रास वाळूही ताब्यात घेण्यात आली.
या कारवाईत वाहनांसह लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित वाळू माफियांवर सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, पूर्णा व ताडकळस पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी अवैध वाळू तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, तस्करांना अप्रत्यक्षपणे अभय दिले जात असल्याचीही चर्चा परिसरात आहे.