

Parbhani Heavy Rainfall crop damage
परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्हयात दौर्ष उघडीपनंतर पुन्हा एकदा पावसाने स्वातंत्र्यदिनाच्या पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नदी-नाले तुडुंब भरल्याने पूर्णा ते झिरोफाटा व अन्य भागातील काही रस्ते बंद पडले. तसेच तालुक्यातील त्रिधारा येथील नदीपात्रातील मंदिरे पूर्णपणे पाण्यात गेल्याचे पहावयास मिळाले. तसेच अनेक शेतशिवारातील पिकांत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन व कापूस या पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचे पहावयास मिळाले.
तालुक्यातील नांदापूर, मांडवा, डिग्रस गोकूळवाडी येथील शेतजमिनी या लोअर दुधनाचा कालवा फुटल्याने खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील वर्णा परिसरातही जोरदार पाऊस पडल्याने शेतशिवारात पाणी साचले होते. यामुळे खरिपातील सोयाबीन व कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
बोरी शिवारातही पिके पाण्याखाली गेली. दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वालूर ते सेलू व मानवतरोड ते वालूर या हा रस्ताही दुधना नदीला पुर आल्याने बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.
थुना नदीला पूर, वाहतूक विस्कळीत पूर्णा : माटेगाव जवळील थुना नदीला पूर आल्याने उच्वपातळी पूलकामातील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांनाही शेतात जनावरांचे चारापाणी करण्यास अडचणी आल्या. शुक्रवारी रात्रीपासून झिरोफाटा ते पूर्णा मार्ग बंद झाला. उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी पुराच्या पाण्यातून वाहतूक करु नये, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूर्णा तालुक्यात नदी-नाले तुडुंब, पिकात पाणी पूर्णा : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालूच असून शिवारातील नदीनाल्यांना पुर आला. शेतशिवारातून पाणी वाहत असल्याने खरीपातील उभी पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून जनावरांना चारापाणी करणेही कठीण बनले आहे. गोठ्यात पाणी शिरुन चिखल झाला. काही ठिकाणी ओढ्यांना पुर आल्याने शेतात जाणे अवघड बनले. शाळकरी मुलांचीही तारांबळ उडाली असून सखल भागातील खरीप पीके पाण्याखाली जावून वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. जनजीवन विस्कळीत झाले.
ताडकळस व परिसरात ढगफुटी सद्दश्य पावसाने पिके पाण्यात, आ. गुहेंकडून शेतबांधावर पाहणी ताडकळस : परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे ताडकळसजवळील पिगळगडा, गोदा नदीनाल्यांसह ओढ्याना पुर आला. सोयाबीन, कापूस, तुर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसाने सोयाबीन, कापूस, भाजीपाला वाहून गेला. तसेच शेतआखाडयांचेही नुकसान झाले. परिसरातील कळगाव, कळगाववाडी, मुंबर, गोळेगाव, धानोरा काळे, फुलकळस, माखणी, महातपुरी, सिरकळस, एकुरखा, निळा, महागाव, खांबेगाव, बानेगाव, माहेर येथील शेतकरी हवालदिल झाले.
दरम्यान आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून एसडीएम जीवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, मंडळ अधिकारी बालाजी गाडगे, कृषी अधिकारी प्रवीण काळे यांना दूजाभाव न करता पंचनामे करण्याचे सांगितले. यावेळी बाजार समिती सभापती बालाजी रुद्रवार, उध्दवराव काळे, प्रताप काळे, गोविंद काळे, बालाजी काळे, लक्ष्मण काळे उपस्थित होते.