

Parbhani Heavy Rain Farmer Crop Damage
एरंडेश्वर : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर आणि कानेश्वर परिसरात शनिवारी (दि.६) सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेक शेतांतील घडफळाला आलेली केळीची झाडे उन्मळून पडली. तसेच इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात पावसाचे पाणी शेतांमध्ये साचल्याने नुकसानीची तीव्रता आणखी वाढली असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पाहणी मोहीम हाती घेतली. पूर्णा तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने एरंडेश्वर परिसरातील नुकसानग्रस्त शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, सरपंच प्रतिनिधी मुंजाजी पिसाळ, मंडळ कृषी अधिकारी एस. एस. वाघमोडे, उपकृषी अधिकारी स्वप्नील शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी टी. जे. कदम, सहाय्यक कृषी अधिकारी एस. एम. गोठवाल तसेच तलाठी एस. टी. राठोड उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली आणि परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांनी केळीबागांसह विविध पिकांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांना दाखवून देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. मोठ्या मेहनतीने जोपासलेली पिके काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने यंदाच्या हंगामातील उत्पन्नावर पाणी फिरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले असून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
केळी उत्पादकांना सर्वाधिक फटका
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एरंडेश्वर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घडफळाला आलेल्या अनेक केळीबागा जमीनदोस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.