

Raid on sand mafias in the Godavari riverbed; JCB and three tractors seized
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) शनिवारी (दि.६) रात्री १०.४५ वाजता मोठी कारवाई करत रेती माफियांना जोरदार दणका दिला. तालुक्यातील पिंपरी-नागठाणा परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर धाड टाकून पथकाने तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त केली. या कारवाईत एकूण ४० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या कारवाईने रेती माफियांच्या हालचालींना काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रेती उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत होत्या. मात्र, या व्यवसायामागे प्रभावशाली साखळी कार्यरत असल्याची चर्चा असल्याने कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तालुक्यात गस्त घालत असताना पिंपरी-नागठाणा येथील गोदा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी जेसीवी सहाय्याने नदीपात्रातून रेती उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी घटनास्थळावरून तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी ताब्यात घेतली. जप्त वाहनांची किंमत आणि इतर साहित्य मिळून एकूण ४० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे हेडकॉन्स्टेबल माणिक वाघ यांच्या फिर्यादीवरून संबंधित ट्रॅक्टर चालक-मालक तसेच जेसीबी चालक- मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, हेडकॉन्स्टेबल महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, पोलीस कॉन्स्टेबल शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे, हनवते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने कारवाई केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध रेती उत्खनन इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना स्थानिक स्तरावर त्याची माहिती नव्हती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच पुढील काळात गंगाखेड पोलिसांकडूनही रेती माफियांविरोधात सातत्याने व कठोर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले.