Parbhani Fuel Crisis | पूर्णा तालुक्यात डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर चालक-मालक हैराण

यांत्रिकीकरणावर आधारित शेती मशागतीच्या कामांवर गंडांतर
Purna Diesel Shortage
Purna Diesel ShortagePudhari
Published on
Updated on

Purna Diesel Shortage

पूर्णा : पूर्णा शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होत असल्याने ट्रॅक्टर व जेसीबी चालक-मालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या खरीपपूर्व शेती मशागतीची धामधूम सुरू असताना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केली जाणारी शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे.

पूर्णा शहरात इंडियन ऑइल, एचपी, बीपी आणि एस्सार कंपनीचे मिळून एकूण पाच पेट्रोल पंप आहेत. यापैकी एस्सारचा पेट्रोल पंप मशीन बिघाडामुळे अनेक दिवस बंद होता. तर इतर पंपांवर अधूनमधून डिझेल टंचाई निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Purna Diesel Shortage
Parbhani Fuel Shortage | ताडकळस परिसरात डिझेल-पेट्रोलसाठी शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा

डिझेलचा साठा संपल्यानंतर नवीन टँकर येईपर्यंत पंप अनेक तास बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ट्रॅक्टर चालक कॅन घेऊन तासन्तास प्रतीक्षा करत बसत असले तरी आवश्यक त्या वेळी इंधन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ज्या पेट्रोल पंपांना कमी अंतरावरील डेपोतून इंधन पुरवठा केला जातो, त्या पंपांवर इंधन तुलनेने लवकर पोहोचत असले तरी उपलब्ध साठा अवघ्या दोन-तीन तासांत संपून जात आहे. तर काही पंपांसाठी पुरवठा होणाऱ्या डेपोचे अंतर जास्त असल्याने त्या ठिकाणी दोन दिवसांपर्यंत इंधन पोहोचण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Purna Diesel Shortage
Parbhani News | गॅस एजन्सींची 'कृत्रिम टंचाई'; ताडकळस परिसरात घरगुती सिलेंडरचा उघड काळाबाजार, पुरवठा विभाग सुस्त

या संदर्भात पेट्रोल पंप चालक व व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, “वरून इंधन टंचाई नसून वाहतूक व्यवस्थेमध्ये विलंब होत आहे. तसेच साठा उपलब्ध झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठी असल्याने डिझेल आणि पेट्रोल लगेच संपून जाते,” असे सांगण्यात आले.

सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असताना इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेत मशागत न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने तातडीने हस्तक्षेप करून पेट्रोल आणि डिझेलचा नियमित व सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news