

Parbhani Zerophata Hitech School news
पूर्णा: तालुक्यातील एरंडेश्वर शिवार झिरोफाटा येथे हायटेक रेसिडेंसीयल स्कूल मध्ये मुलीची टीसी मागितल्या प्रकरणी आणि प्रवेशाचे उर्वरित पैसे का देत नाही ? म्हणून चिडलेल्या संस्थाचालक दांपत्याच्या जबर मारहाणीत उखळद येथील विद्यार्थीनी पल्लवीचे वडील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. ही धक्कादायक घटना १० जुलैरोजी घडली होती.
या घटनेनंतर संस्थाचालक दांपत्य फरार झाले आहे. मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलिसांत दांपत्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी यांच्या शोधासाठी पोलीस अधिकारी रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी तीन पोलिस पथके स्थापन करून रवाना केली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर उखळदकर ग्रामस्थ व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. आरोपी संस्थाचालक दांपत्याला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होऊ लागली आहे.
संस्थाचालक दांपत्याच्या मारहाणीत पालकाचा बळी गेला आहे. तरी शिक्षण विभाग या शाळेवर कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांतून होत आहे.