

पूर्णा: परभणी तालुक्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये एका विद्यार्थिनीच्या पालकाला शाळा व्यवस्थापनाकडून झालेल्या बेदम मारहाणीनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी जिल्ह्यातील उखळद येथील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) यांनी आपल्या मुलीचे यंदा जून महिन्यात झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत प्रवेश घेतला होता. मात्र मुलगी निवासी शाळेत राहण्यास इच्छुक नसल्यामुळे पालकांनी १० जुलै रोजी शाळेचा दाखला (टीसी) मागण्यासाठी शाळेत भेट दिली होती.
टीसी देण्याऐवजी शाळेच्या संस्थाचालकांनी उर्वरित प्रवेश शुल्काची मागणी करत पालक जगन्नाथ हेंडगे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नंतर त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची साक्ष देणारे नातेवाईक मुंजाजी हेंडगे (वय ६५) यांनी सांगितले की, त्यांनी शाळेच्या गेटवर थांबले असताना जगन्नाथ हेंडगे कार्यालयात गेले. काही वेळातच ते आरडाओरड करत बाहेर आले आणि मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने रागाच्या भरात पुन्हा लाथा मारल्या आणि "उर्वरित पैसे देत नाहीस, तर केस करतो" असे म्हणत कार घेऊन निघून गेले.
या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरुद्ध गु.र.नं. ०२९८/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. विलास गोबाडे हे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
जगन्नाथ हेंडगे हे कीर्तनकार व सांप्रदायिक व्यक्तीमत्व म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे उखळद गावात शोककळा पसरली असून, ११ जुलै रोजी त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणामुळे हायटेक रेसिडेन्शियल स्कूलच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप होत असून, संस्थेच्या कार्यपद्धतीवर पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळांमधील पालकांशी होणारा वर्तनाचा दर्जा, आर्थिक जबरदस्ती आणि रहिवासी सुविधांवर देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.