

Parbhani NCP Youth President Ritesh Kale Resignation
पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर येथील रहिवासी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला आहे. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम १३ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय जाहीर झाल्याने पूर्णेतील एरंडेश्वर गटात अचानक राजकीय भूकंप झाला असून, तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
राजीनामा पत्रात रितेश काळे यांनी नमूद केले आहे की, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दिलेल्या संधी व विश्वासाबद्दल ते मनापासून कृतज्ञ आहेत. मात्र अलिकडच्या काळात पक्षाने राज्य व केंद्र पातळीवर घेतलेली भूमिका, तसेच पक्षाच्या मूळ विचारधारेशी सुसंगत नसलेल्या काही पक्षांबरोबर केलेल्या युती व आघाड्यांबाबत त्यांनी सखोल विचार व आत्मचिंतन केले.
यामधून सध्याची पक्षाची दिशा व आपली वैचारिक भूमिका यामध्ये मूलभूत फरक निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच पक्षाच्या मूळ विचारांशी सुसंगत उपक्रम राबविण्यासाठी अपेक्षित ठोस भूमिका दिसून येत नसल्याने त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षातील सहकारी, कार्यकर्ते व कार्यकाळातील आठवणी सदैव स्मरणात राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, परभणी जिल्हा व पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहणारे रितेश काळे आता पुढील राजकीय भूमिका काय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परभणी व पूर्णा तालुक्यात सामाजिक व शेतकरी हितासाठी झगडणारे उभरते नेतृत्व म्हणून रितेश काळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी फारकत घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत ते उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करून आगामी एरंडेश्वर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे.