

Purna Pangra Road Protest
पूर्णा : तालुक्यातील पूर्णा ते पांगरा (हिवरा) हा रस्ता नव्याने मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आशिर्वाद कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे व अपुरे काम करून रस्त्यावर केवळ दोन मेटल लेअर टाकून काम अर्धवट अवस्थेत सोडले. परिणामी हा रस्ता उखडून गिट्टीमय झाला असून त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक नागरिक दुचाकीवरून घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १४) दुपारी डेमोक्रॅटिक संघटनेसह संबंधित ग्रामस्थांनी जि.प. आचारसंहिता नियमांचे पालन करत, कोणताही अडथळा न आणता लोकशाही मार्गाने काही काळ रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात डेमोक्रॅटिक व माकपचे पदाधिकारी कॉ. नशीर शेख, सुबोध खंदारे, पांडुरंग दुथडे, शुभम गायकवाड, मंगेश साबळे, युवा मंचाचे बाबाराव ढोणे, ज्येष्ठ पत्रकार आनंद ढोणे, सरपंच उत्तमराव ढोणे, साईनाथ ढोणे, सहादू कापूरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलकांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता वाघ व कुलकर्णी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासाठी मेटल वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अडचणी येत असल्याचे कारण सांगून वेळ निभावून नेली. तसेच संबंधित कंत्राटदार नियमित काम करत नसल्याने त्याच्यावर सव्वा कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र येत्या दहा दिवसांत काम सुरू न झाल्यास अधिक तीव्र व आगळेवेगळे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.