

परभणी : बुधवारी (दि.२६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी-शिवसैनिक युवासंवाद मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दि.२७ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेवून आम्ही सत्तेमध्ये आहोत. त्यामुळे विकास निधीसाठी आम्हाला कुठे जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले.
परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी महापौर प्रताप देशमुख व नगरसेवक अक्षय देशमुख यांच्यातील गटबाजी वारंवार उघड झाली होती. महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारेकाही अलबेल नव्हते. माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ४ महिन्यापूर्वीच पक्षश्रेष्ठीकडे सोपावला होता. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपण शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही शिदेसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमहापौर गणेश देशमुख यांच्या दालनात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑफर आली तरी पक्षप्रवेश करणार नाही
शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार काय ? या विषयी विचारले असताना आम्ही सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे विकास निधीसाठी आम्हाला अन्य कुठल्याही पक्षात जायची गरज नाही. कुठलीही ऑफर आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्पष्ट केली. माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासोबत गेलेले सर्व नगरसेवक हे माजी नगरसेवक असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत करण्यात आला