

Manwat Municipal Council Sanitation Workers Strike
मानवत : कालबद्ध पदोन्नतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मानवत नगरपालिकेतील ७४ सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (२७ ऑगस्ट) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यानंतर पालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मराठवाडा नगरपालिका कामगार व कर्मचारी संघटना लालबावटा यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी कचरे आणि अशोक बुरखुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संत सावता माळी रोडवरील जनशक्ती कार्यालयापासून पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर मुख्याधिकारी कोमल सावरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कालबद्ध पदोन्नतीसह विविध मागण्या
सफाई कर्मचाऱ्यांना १० ते ३० वर्षांची कालबद्ध पदोन्नती नियमानुसार आणि वेळेत देण्यात यावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या १० आणि १४ टक्के कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, खास घेतलेली रजा संबंधित महिन्यातच मंजूर करावी आणि कायमस्वरूपी एक पगारी कामाचे आदेश देण्यात यावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कार्तिक मुजमुले, उपाध्यक्ष संजय दवणे, सचिव रवी धबडगे, कोषाध्यक्ष आकाश धापसे यांच्यासह सागर गाडे, प्रल्हाद भदर्गे, पद्मपाणि भदर्गे, राजेश भदर्गे, सुनील वाल्मिकी, भारती बागडे, सीमा मुजमुले, कविता डंबाळे आणि अन्य सफाई कर्मचारी सहभागी झाले आहेत.