Purna Encroachment | पूर्णा-चुडावा-ताडकळस मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुलडोझर

सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई; ४८ दुकानदारांना दिल्या होत्या नोटिसा
Encroachment Demolition Purna Parbhani
Encroachment Demolition Purna ParbhaniPudhari
Published on
Updated on

Encroachment Demolition Purna Parbhani

पूर्णा : पूर्णा-चुडावा मार्गावरील टाकळी फाटा ते ताडकळस-पूर्णा मुख्य रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (दि. २७) धडक कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या हद्दीत उभारण्यात आलेली विविध दुकाने व प्रतिष्ठाने हटविण्यात आली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.

तहसील कार्यालयासमोरील परिसरात मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना हॉटेल्स, विधिज्ञ नोटरी शॉप, झेरॉक्स सेंटर यासह विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने रस्त्याच्या दुतर्फा थाटण्यात आली होती. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईचा निर्णय घेतला.

Encroachment Demolition Purna Parbhani
Parbhani News : रायखेडा शिवारात गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर पकडला

सा. बां. उपविभागीय अभियंता संजयकुमार देशपांडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार अतिक्रमणधारक ४८ दुकानदारांना प्रतिष्ठाने हटविण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. नोटीस मिळाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली. मात्र, काहींनी मुदत उलटूनही दुकाने न हटवल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करावी लागली.

या कारवाईदरम्यान तहसील कार्यालयासमोरील तसेच ताडकळस फाटा टी-पॉइंट ते ध. टाकळी फाटा परिसरातील अतिक्रमणीत दुकाने हटविण्यात आली. कारवाईमुळे रस्त्याची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, अपघाताची शक्यता आणि वाहतुकीतील अडथळे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Encroachment Demolition Purna Parbhani
Parbhani News : ३३ केव्ही सबस्टेशनला भीषण आग; परभणीचा २५ टक्के वीजपुरवठा ठप्प

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी संबंधित अतिक्रमणधारकांच्या दुकानांवर मालकांची नावे नमूद करून अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा चिकटवल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नोटिशीनुसार, पोखर्णी, बोरखेड खुर्द, पूर्णा तालुक्यातील लिंबला-ताडकळस ते पूर्णा तालुका-जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या हद्दीत दोन्ही बाजूंना निश्चित क्षेत्राचा समावेश आहे. संबंधित अतिक्रमणे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, मुदतीत अतिक्रमणे न हटवल्याने रस्ते सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

कारवाईच्या वेळी सा. बां. विभागाचे उपअभियंता संजयकुमार देशपांडे, अभियंता शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पालिका ओएस मुंमतजीत खान यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news