Parbhani Protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

महापौर सय्यद इक्‍बाल यांच्‍यावरील हल्‍ल्‍याचा निषेध; संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
Parbhani mayor attack attempt
महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनpudhari photo
Published on
Updated on

परभणी: मनपाचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१०) महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. शहराच्या प्रथम नागरिकावरच हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनल्याची भावना आंदोलना दरम्यान व्यक्त करण्यात आली.

गुरुवारी (दि.९) महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेच्या निषेधार्थ मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत हल्ल्याचा निषेध नोंदविला तसेच दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली.

Parbhani mayor attack attempt
BMC Promotion : पालिकेतील कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास २ वर्षां पदोन्नती अपात्र

आंदोलनाची माहिती मिळताच महापौर सय्यद इक्बाल यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि महापालिकेची अत्यावश्यक कामे ठप्प होऊ नयेत, यासाठी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौरांच्या विनंतीला मान देत कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवसाऐवजी अर्ध्या दिवसाचे कामबंद आंदोलन करून दुपारनंतर नियमित कामकाज सुरू केले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी, महापौरांसारख्या लोकप्रतिनिधीवर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल, तर सामान्य कर्मचारी किती सुरक्षित आहेत? असा सवाल उपस्थित केला. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Parbhani mayor attack attempt
Parbhani news : जिल्हा परिषदेत नियमबाह्य पदोन्नतीचा फुगा फुटला

आंदोलनात म्‍युनिसीपल कर्मचारी- कामगार सेनेचे जिल्‍हाध्यक्ष जालिंदर कांबळे, जिल्‍हा उपाध्यक्ष नजम खान, जिल्‍हा सरचिटणीस मनोज गहलोत, महानगर पालिकेतील अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान पठाण, सचिव विशाल उफाडे, स्‍वच्‍छता कामगार संघटनेच्‍या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाकळे, अभिजीत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्‍य फेडरेशनचे उपाध्यक्ष खाजा मोईन खान, कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्‍यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news