

परभणी : महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आवश्यक वाहन परवाने वेळेत मिळत नसल्याने विरोधी पक्षातील उमेदवार चांगलेच त्रस्त झाले. चार दिवसांपासून परवाने मिळत नसल्याने काँग्रेस, उबाठा शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षांच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि.6) मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.
वाहन परवाने मिळण्यासाठी उमेदवारांना निवडणूक विभाग कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, तरीही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अखेर संतप्त उमेदवारांनी थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन घेराव घालत जाब विचारला.
यावेळी काँग्रेसचे प्रभाग 9 मधील उमेदवार अमोल जाधव यांनी गंभीर आरोप करत आम्ही चार दिवसांपासून वाहन परवाने मागणी करूनही दिले जात नाहीत. मात्र सत्ताधारी भाजपच्या उमेदवार व कार्यकर्त्यांना घरपोच परवाने दिले जात आहेत. हा प्रकार पूर्णपणे अन्यायकारक आहे असे म्हटले. निवडणूक निर्णय अधिकारी नार्वेकर हे एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसह निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली. दरम्यान, वेळेत वाहन परवाने न मिळाल्यास प्रचारावर मोठा परिणाम होणार असून, समान संधी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उमेदवारांनी दिला. निवडणूक विभागाने तत्काळ सर्व उमेदवारांना समान न्याय देत परवाने वितरित करावेत, अशी मागणी केली आहे.