

आन्वा ः मागील वर्षी अवकाळी तसेच परतीच्या पावसाने अनेक खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामळे शेतकरी रब्बी पिकावर अवलंबन आहेत. परंतु हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामळे रब्बी पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे.
निर्सगाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचे आर्थिक चक्र मात्र बिघडले आहे. अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे. वातावरणातील बदलाने पिकांच्या उत्पादनावर होणार असून, ते घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. वातावरणातील या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके संकटात आली आहेत.
मागील वर्षी खरिपातील पिके देखील चांगली आली होती. मात्र, खरिपातील पिके काढणीला आली असतानाच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे पिके कुजल्याने, काळी पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद झाले.
या संकटातून बाहेर पडत शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांच्या कामांना प्रारंभ केला होता. परतीच्या पावसाची जमिनीमध्ये ओल टिकल्याने रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, कांदा, अशी पिके चांगली उगवली होती. मात्र, आता पुन्हा ढगाळ हवामान व सकाळच्या वेळी पडणारे दाट धुके, यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका वाढला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असून ते सकाळी दहा ते बारापर्यंत कायम असते. या धुक्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
ढगाळ हवामान व सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे. बदलत्या वातावरणामुळे पिकांवर महागडी औषधे फवारावी लागतात. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. त्यातच आता सातत्याने वातावरणात बदल होत असल्यामुळे पिकांवर कितीवेळा महागडी औषधे फवारणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर असून बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
हरभरा पिकाला सर्वाधिक फटका
सध्याच्या वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसत आहे. सकाळचे धुके अन् दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हे वातावरण रोग वाढीस पोषक असते. विशेषत: हरभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहेत.