

परभणी : जिल्हा परिषदेच्या शहरातील गंगाखेड नाका परिसरात असलेल्या शासकीय पोल्ट्री फार्ममध्ये काही वर्षांपासून निधीअभावी कुक्कुटपालनाचे काम मर्यादित स्वरूपात सुरू होते. मात्र 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आलेली असून तो निधी लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हा निधी उपलब्ध होताच या पोल्ट्री फार्मवर पुन्हा मोठ्या प्रमाणात पक्षी संगोपन सुरू करण्यात येणार असल्याने शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचतगट तसेच प्रशिक्षणार्थींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात या पोल्ट्री फार्मवर अंड्यांच्या उत्पादनातून 61 हजार 933 रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर 2021-22 मध्ये 470 कोंबड्यांच्या विक्रीतून 35 हजार 270 रुपये उत्पन्न प्राप्त झाले. याच वर्षात अंड्यांच्या विक्रीतून 44 हजार 596 रुपये इतके उत्पन्न मिळालेे. मात्र 2022-23 आणि 2023-24 या दोन आर्थिक वर्षांत शासनाकडून पक्षी संगोपनासाठी कोणताही निधी प्राप्त न झाल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या होत्या. निधीअभावी अडचणी असतानाही या पोल्ट्री फार्ममार्फत कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यात आले आहे.
मार्च 2025 मध्ये 170 प्रशिक्षणार्थींसाठी 5 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून 34 हजार रुपये इतके सेवा शुल्क प्राप्त झाले. तसेच मार्च 2025 मध्ये तीन महिला बचत गटांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरत आहे. या फार्मसाठी लागणारी एकदिवसीय कुक्कुट पिले ही छत्रपती संभाजीनगर व पडेगाव येथील कुक्कुट प्रकल्पातून आणली जातात. परभणी येथील या शासकीय कुक्कुट प्रकल्पात सध्या पशुधन विकास अधिकारी व सहायक पशुधन विकास अधिकारी ही दोन्ही पदे कार्यरत आहेत. मात्र परिचरांची 4 मंजूर पदे असून त्यापैकी 2 पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत या पोल्ट्री फार्ममध्ये एकूण 4 शेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 2 शेड 1964 मध्ये, तर उर्वरित 2 शेड 2010 मध्ये बांधण्यात आले आहेत. जुन्या 2 शेडची मार्च 2025 मध्ये दुरुस्ती करण्यात आल्याने पक्षी संगोपनासाठी सुविधा सुधारल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 10 एकर जागेचा वापर करण्यात येत आहे.
शासनाकडून अपेक्षित निधी प्राप्त झाल्यानंतर या शासकीय पोल्ट्री फार्मवर पुन्हा मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन सुरू होणार असून त्याचा लाभ शेतकरी, बेरोजगार युवक व महिला बचत गटांना होणार आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प पुन्हा सक्रिय होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता या निधीकडे लागले आहे.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे उगवणुकीची अंडी ही प्रति नग 8 रुपये व प्रति पक्षी 75 रुपये तसेच एक दिवशीय पिल्ले यांची 20 रुपये दराने विक्री केली जाते. हे पक्षी व अंडी खासगी लाभार्थ्यांना विक्री केले जातात अशी माहिती कुक्कुट पालनच्या पशुधन विकास अधिकारी डॉ.प्राजक्ता कुलकर्णी-गळाकाटू यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.