

परभणी : शहर व जिल्ह्यातील विविध भागांत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ५ चोरट्यांना अटक केली आहे. या टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी एकूण ९ गुन्ह्यांची उकल केली असून १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची अंदाजे किंमत ४ लाख २० हजार रुपये आहे.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी अरुण उत्तम कांबळे (वय १९, रा. प्रकाश आंबेडकर नगर, परभणी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचे चार साथीदार मोहन नवघरे, ओमकार तीथे, मल्हारी ऊर्फ हरी कसबे आणि नागेश तुरे यांनाही अटक करण्यात आली. ही टोळी नानलपेठ, ताडकळस, नवामोंढा व चुडावा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे करत होती. त्यांच्याकडून रॉयल एनफील्ड बुलेट, बजाज पल्सर, हिरो स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन अशा विविध कंपन्यांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अरुण उत्तम कांबळे (वय १९), रा. प्रकाश आंबेडकर नगर, परभणी, मोहन शामराव नवघरे (वय १९), रा. जिजामाता रोड, परभणी, ओमकार शिवाजीराव तीथे (वय १९), रा. मल्हारी नगर, परभणी, मल्हारी ऊर्फ हरी लक्ष्मण कसबे (वय १९), रा. महात्मा गांधी नगर, परभणी, नागेश रामदास तुरे (वय २२), रा. वालूर, ता. सेलू यांना अटक केली आहे. सदरची कारवाई सपोनि. राजू मत्येपोड, पोअं. मधूकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपूते, रवि जाधव, सूर्यकांत फड, लक्ष्मण कांगणे आदी कर्मचाऱ्यांनी केली असून सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे परभणी जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.