

Argument between two over a message sent to his girlfriend; Youth murdered in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा
प्रेयसीला पंधरा दिवसांपूर्वी मोबाईलवरून पाठविलेल्या मेसेजवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. या वादाची परिणीती गंभीर हाणामारीत होवून एका (32 वर्षीय) तरूणाचा धारदार शस्त्रांनी भोसकून खुन करण्यात आला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.9) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास जिंतूर रोडवरील ठाकरे कमानीजवळील हनुमान मंदिराच्या पाठीमागे घडली.
या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. अन्य तीन संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
विशाल विनायक कदम-आर्वीकर (वय 32) रा.आर्वी, ता.परभणी, ह.मु.बालाजी नगर परभणी असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी वर्षा श्रीधर कदम रा.काकडे नगर, परभणी यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत मृत विशाल कदम याचे लातूर येथील एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. ते दोघे लवकरच विवाह ही करणार होते असे असताना विशाल कदम याच्या ओळखीचा विकी पाष्टे याने विशालची प्रेयसी असलेल्या तरूणीस मोबाईलवर मेसेज पाठविला होता. हा मेसेज संबंधित तरूणीने विशालला पाठवुन दिल्यामुळे विशाल व विकी पाष्टे या दोघांमध्ये वादही झाला होता.
या वादानंतर विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांनी विशाल कदम याच्या घरी जावून त्याच्या आईला आमच्या बहिणीच्या विवाहानंतर विशालला खतम करू अशी धमकी दिली होती. शुक्रवारी (दि.9) विशाल कदम व आर्वी येथीलच विलास कदम ह.मु,एकनाथ नगर परभणी हे जिंतूर रोडवरील ठाकरे कमानीजवळ एकत्र आले व हनुमान मदिराच्या पाठीमागील रोडवर बोलत उभे राहिलेले होते.
याचवेळी दोन मोटारसायलवरून विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत हे घटनास्थळी येत त्यांनी विशाल याच्यावर धारदार शस्त्र व हातोड्याने वार केले. यावेळी विलास कदम याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्याला बाजूला होण्यास सांगितले. धारदार शस्त्र व हातोडयाने मारहाण केल्यानंतर विशाल कदम हा जमिनीवर कोसळल्याचे दिसताच संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला.
विशाल कदम यास जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात वरील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शहर दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक कामठेवाड, सपोनि खजे, कारवार, सय्यद यांच्यासह पोह सुधाकर कुटे, सानप, रासवे, कांबळे व पठाण यांनी भेट देवून पंचनामा केला.