

Charthana Police Accused Caught
चारठाणा : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेवण व चौकशीसाठी लॉकअप मधून बाहेर काढले असता तो पोलीस ठाण्याच्या संरक्षक भीतीवरून उडी मारून पसार झाला. रामा घोगरे (रा. खोल गाडगा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी चारठाणा पोलीस ठाण्यात घडली. दोन दिवस झाले तरी पोलिसांना त्याचा पत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
चारठाणा येथील पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी रामा घोगरे याला अटक करून त्याची चौकशी सुरू होती. त्यांने मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. त्याला सेलू न्यायलायासमोर उभे केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी बुधवारी (दि. ३०) आरोपीला जेवण व चौकशीसाठी लॉकअप मधून बाहेर काढले. यावेळी आरोपी रामा घोगरे पोलीस ठाण्याच्या संरक्षक भीतीवरून उडी मारून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात आणि चारठाणा गावात नदी, नाले, शेतात त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही.
पोलिसांना आरोपी मानवतला असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे, पोलीस उपनिरीक्षक एस एन थोरवे, उद्धव माने, उमेश बारहते, दत्त भदर्गे, जिलानी शेख, वसीम इनामदार आदी पोलीस मानवतमध्ये तळ ठोकून होते.
गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बिरादार चाटे यांना आरोपी घोगरे वाईमार्ग वालूरला गेला. त्यानंतर एका दुचाकीवरून मानवतला गेला. तो आईसोबत फोनवरून बोलत होता, अशी माहिती मिळाली. त्यावरून गुरुवारी (दि.१) रात्री साडेदहा वाजता किन्होळा (ता. मानवत, जि. परभणी) येथे कदम यांच्या आखाड्यावर त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले.